satyaupasak

मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांवर गुन्हा दाखल; अडचणी वाढण्याची शक्यता, कारण काय?

Manoj Jarange Patil & Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्याविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची हत्या सध्या चर्चेत असून या प्रकरणाचा मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणावरून विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात विविध ठिकाणी निषेध मोर्चे काढले जात आहेत. परभणीतील मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यकर्त्यांकडून माझा मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला होता. यानंतर मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून आले. आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्या विरोधात किनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या निषेधार्ह आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. मात्र, या घटनेचा आधार घेत मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया हे सातत्याने वंजारी समाजावर टीका करत आहेत. समाजाचे नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. एवढेच नव्हे, तर समाजातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लक्ष करण्यात येत आहे. वंजारी समाजाबद्दल जातीय तेढ निर्माण होईल, अशा स्वरूपाची वक्तव्ये होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा स्वरूपाची तक्रार किशोर गंगारामजी मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार, मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 352, 351/2, 351/3, आणि 3(5) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा
परभणीतील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना थेट इशारा दिला होता. त्यांनी सांगितलं की, “धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आहे, आणि तो न्यायासाठी संघर्ष करतोय, वणवण भटकतोय. त्याला धमक्या देण्याचा प्रयत्न होत आहे. संतोष भैयांचे भाऊ जेव्हा पोलीस ठाण्यात गेले, त्यावेळी त्यांना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांच्या कुटुंबातील कुणालाही त्रास झाला, तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास होण्याचं धाडस कोणीही करू नये, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.”

काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं की, “बीडमधील सर्व उच्च पदांवर वंजारी समाजातील लोक आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या काळापासूनच हे होत आहे,” असा आरोप त्यांनी केला होता. या विधानावरून मुंडे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यानंतर अंजली दमानिया यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.
“मी कोणत्याही प्रकारे जाती किंवा समाजाविरोधात बोललेले नाही. ट्विटरवर दोन मुद्द्यांच्या माध्यमातून मी हे स्पष्ट केलं आहे. भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत. वंजारी समाजाला ही बाब चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आली. सानप आणि मुंडे हे उच्च पदावरील लोक नेहमीच परळीत का असतात? याविषयी मी बोलले आणि लिहिलं होतं. वंजारी समाजाचा वापर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून होतोय, हे निश्चित. तसंच, मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून माझा मानसिक छळ होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं.”

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *